हा IPO ठरणार गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! आयपीओविषयी सर्वकाही माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्रीतून (IPO Initial Public Offering) कमाई करण्याची चांगली संधी गुंतवणूकदारांना असते. कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवण्याचा आयपीओ (IPO) हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आयपीओकडे लागलेलं असतं. देशातली सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा (LIC IPO News) आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओकडे (lic ipo date) शेअर बाजाराचं लक्ष लागून राहिलं आहे. एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येईल. केंद्र सरकारने एलआयसीच्या आयपीओतून 90 हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आयपीओ येण्याआधी एलआयसीची माहिती गुंतवणूकदारांना असणं आवश्यक आहे. यामधून हा आयपीओ किती महत्त्वाचा आहे हे समजून येईल.

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात सरकारी कंपन्यांमधला आपला हिस्सा विकून 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं आहे. एलआयसीचा आयपीओ हासुद्धा त्याच निर्गुंतवणुकीचा एक भाग आहे. एलआयसीमधला आपला काही हिस्सा विकल्याशिवाय सरकारला निर्गुंतवणुकीचं हे लक्ष्य पूर्ण करता येणार नाही. यासाठी आयपीओ आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. एलआयसीचा हा आयपीओ विमा उद्योगातला सर्वांत मोठा आणि जगातला दुसरा सर्वांत मोठा आयपीओ असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

संपूर्ण देशातल्या गुंतवणूकदारांच्या नजरा या आयपीओवर असतील. विशेषतः ज्या गुंतवणूकदारांची एलआयसीमध्ये पॉलिसी आहे त्यांना याचा अधिक फायदा होईल. याचं कारण म्हणजे या आयपीओमध्ये एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठीही 10 टक्के शेअर्स राखीव असणार आहेत. सरकारने याची घोषणा आधीच केली आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना एलआयसीच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने ठेवण्यासाठी सरकारला एलआयसी कायदा 1956 मध्ये सुधारणा करावी लागली.

आयपीओला केंद्र सरकारचा हिरवा सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे आयपीओ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येईल, असं मत केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केलं आहे. आयपीओसाठी सरकारने 10 मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली आहे. आयपीओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेल्या बँकर्समध्ये गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडचा समावेश आहे.

आयपीओमधले शेअर्स कोणत्या किमतीला बाजारात आणले जातील हे अद्याप ठरलेलं नाही; मात्र प्राइस बँड 400 ते 600 रुपये प्रति शेअर असू शकतो, असा शेअर बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे. एलआयसीचे देशभरात 1 लाखापेक्षा जास्त कर्मचारी, 12 लाखांहून अधिक एजंट आणि 30 कोटी पॉलिसीधारक आहेत. देशभरातल्या 2000 हून अधिक कार्यालयांमार्फत एलआयसी आपला कारभार पाहते. देशांतर्गत विमा बाजारात एलआयसीचा दोन तृतीयांशपेक्षा जास्त हिस्सा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *