तुळजाभवानी मंदिरात 15 हजार भाविकांना प्रवेश; अंबाजोगाईत दर दोन तासांनी सॅनिटायझेशन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑक्टोबर । राज्य सरकारने सात ऑक्टोबरपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या मंदिरात तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दोन्ही ठिकाणी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. यात नवरात्रोत्सवादरम्यान दररोज १५ हजार भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे, तर अंबाजोगाईत कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरक्षिततेचे सर्व उपाय केले जाणार आहेत.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन दररोज पंधरा हजार भाविकांना मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन दर्शन पासेससह भक्तांना दर्शन घेण्यासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. www.shreetuljabhavani.org या संकेतस्थळावर दर्शन पासेस उपलब्ध आहेत. यासाठी कोरोना लसीकरण, ६५ वर्षांवरील नागरिक, गरोदर माता, १० वर्षांपेक्षा कमी वयाचे बालक यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. मंदिर परिसरात २०० मीटरपर्यंत सोललेले नारळ व सुटे तेल विक्री ब॔ंद केली आहे. त्याचबरोबर भक्तांना केवळ दर्शन घेता येईल.

यंदा ७ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. देवीच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी पान, फूल, बेल अथवा ओटीचे साहित्य आणू नये, असे आवाहन देवल कमिटीने केले आहे. मंदिराच्या पूर्व द्वारामधून भाविकांना दर्शनासाठी आत प्रवेश दिला जाईल व पश्चिमेच्या द्वारामधून भाविकांना बाहेर जाण्याची सोय केली आहे. दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री नऊ अशी राहणार आहे. मंदिरात मास्कचा वापर तसेच दर दोन तासांनी मंदिर सॅनिटायझिंग करून घेण्यात येणार आहे, असे श्री योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विपिन पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *