धार्मिक स्थळे उद्यापासून खुली, प्रशासन सज्ज; नियमांचे पालन होण्यासाठी सरकारच्या अटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । उद्या गुरुवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे धार्मिक स्थळे उघडण्याची वाट पाहणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी आता मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारांचा कारभार सांभाळणारे प्रशासनही सज्ज झाले आहे. धार्मिक स्थळांमध्ये जाताना जबाबदारीचा विसर पडता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होण्याकरिता सरकारने काही अटीही घातल्या आहेत. सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध केली आहे. भाविकांसाठी दर गुरुवारी १२ वाजता मंदिराने जारी केलेल्या लिंकवरून किंवा मंदिर न्यासाच्या ॲपवरून क्यूआर कोड डाऊनलोड करता येणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून दररोज एका तासाला २५० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. मंदिरात भक्तांकडून हार, प्रसाद स्वीकारला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सरकारने राज्यातील धार्मिक स्थळांसाठी केलेल्या नियमावलीनुसार ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक. कोणत्याही प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती वा ट्रस्टने घ्यायचा आहे.

नवरात्रीसाठी मुंबादेवी मंदिर सज्ज
नवरात्रीच्या काळात मुंबादेवी मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या वतीने ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या एसएमएसमध्ये उल्लेख असलेल्या दिवशी आणि वेळेतच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल तपासणी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आवश्यक आहे. मंदिरात प्रवेशासाठी दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *