महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने मागील १२ दिवसांत डिझेल ३.१५ रुपयांनी महागले आहे. तर पेट्रोलमध्ये १० दिवसांत झालेल्या दरवाढीने २.०५ रुपयांची वाढ झाली आहे.
रविवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ केली होती. सोमवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर मंगळवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली. तसेच बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांची वाढ केली होती.
सलग तीन दिवस झालेल्या दरवाढीने आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.२५ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०३.२४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १००.७५ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०३.९४ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १११.७६ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०६.८३ रुपये झाले आहे.
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९९.५५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९१.७७ रुपये आहे. चेन्नईत ९६.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९४.८८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १००.८० रुपये असून बंगळुरात डिझेल ९७.४० रुपये आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत आहे. बुधवारी अमेरिकेत ब्रेंट क्रूडचा भाव ०.८ डाॅलरने कमी होऊन ८१.०८ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३० डाॅलरने घसरला आणि तो ७७.४३ डाॅलर प्रती बॅरल झाला.