महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या ऑफिसवर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. पुण्यात अजित पवारांच्या दोन बहिणी राहतात. त्यांच्या घरांवरही छापेसत्र सुरूच आहे. पंचवटी सोसायटीत रजनी इंदूलकर आणि मोदी बागेत नीता पाटील यांच्या घरांवर छापे सत्र सुरू आहे.
कोल्हापुरात काल अजित पवारांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर छापा घालण्यात आला. तिथे अजूनही छापेसत्र सुरू आहे. साताऱ्यात जरंडेश्वर सहकारी कारखान्यातही छापेसत्र सुरू आहे. त्याशिवाय अहमदनगरमध्ये अंबालिका साखर कारखाना, बारामतीत सायबर डायनॅमिक्स डेअरी, दौंड साखर कारखाना इथेही छापेसत्र सुरू आहे. याशिवाय आज सकाळी नंदूरबारमध्ये आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केलीय.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर
पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आयकर विभाग आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्ही अजित पवार यांच्या बरोबर आहोत आणि राहणार असे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात आंदोलन केलं.