महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथीच्या (Coronavirus Pandemic) विळख्यातून सगळं जग हळूहळू बाहेर येत आहे. गेल्या दीड वर्षापासून ठप्प असलेले अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आपल्या देशातही (India) निर्बंध शिथील झाल्यानं गेल्या दीड वर्षांपासून भीती, धास्ती बाळगून घरातच अडकून पडलेले नागरिक थोडा मोकळा श्वास घेता आहेत. आता सणासुदीचा काळ (Festive Season) असल्यानं जनतेत उत्साहाचं वातावरण आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यंदा दसरा, दिवाळी या मोठ्या सणांसाठी खरेदीचा मनमुराद आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र यावेळी कपडे खरेदी खिशाला मोठी चाट लावण्याची शक्यता आहे. कारण कापसाचे दर वाढल्यानं कापड निर्मात्यांनी उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेडिमेड कपड्यांच्या (Readymade Apparels) किंमती वाढणार (Price Hike) आहेत.
गेल्या वर्षीपासून सातत्याने कापसाचे (Cotton) भाव वाढत आहेत, आतापर्यंत वस्त्र उत्पादकांनी (Cloth Producers) त्याचा भार सहन केला; पण आता आणखी बोजा उचलणे शक्य नसल्यानं कापडांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कापड निर्मात्या कंपन्यांचं म्हणणं आहे. यामुळे रेडिमेड कपड्यांच्या क्षेत्रातील इंडियन टेरेन आणि रेमंड यूसीओ डेनिमसारखे ब्रँड अधिक महाग होण्याची शक्यता आहे. अनेक अंतर्वस्त्रांच्या ब्रँडसनीदेखील आधीच किमती वाढवल्या आहेत.
आधीच कोविड साथीमुळे रेडिमेड कपड्यांची मागणी मंदावली आहे. त्यात कापसाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याने कापड निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. आता सणासुदीच्या काळात कपड्यांच्या मागणीत सुधारणा दिसून येत आहे; अशावेळी किमती कमी ठेवणं रेडिमेड कपडे उद्योजकांना परवडण्यासारखे नाही. यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. यावर किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.