महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्मरण राहणं चांगली गोष्ट आहे, अशी मिष्किल टिप्पणी पवार यांनी करताच पवार पाच वर्ष कधीच मुख्यमंत्री नव्हते असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पवार नेमके किती वर्ष आणि कोणत्या कोणत्या वर्षी मुख्यमंत्री होते याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टाकलेला हा प्रकाश.
पवारांनी सर्वात आधी 18 जूलै 1978मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पुलोदच्या प्रयोगामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. परंतु, 1980मध्ये इंदिरा गांधींचे केंद्राच्या सत्तेत पुनरागमन झाले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अवघे दोनच वर्ष मिळाली.
मधल्या काळात पवारांनी पुलोदचा प्रयोग केला होता. मात्र, राजीव गांधी पंतप्रधान होताच पवारांनी 1987मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजीव गांधी यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रात बोलावलं आणि त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली. ही 1988ची गोष्ट. त्यानंतर पवारांची 25 जून 1988मध्ये राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
1990मध्ये शिवसेना आणि भाजपची विधानसभेला युती झाली होती. त्यामुळे काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही. 288 पैकी काँग्रेसला 141 जागा मिळाल्या. मात्र, 12 अपक्षांचा पाठिंबा घेऊन पवार 4 मार्च 1990मध्ये मुख्यमंत्री झाले.
6 डिसेंबर 1992मध्ये बाबरी मशीद पडली. त्यामुळे देशात दंगली सुरू झाल्या. मुंबईत प्रचंड जाळपोळ सुरू झाली होती. त्यामुळे मार्च 1993मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊन मुंबई रुळावर आणली. 1993 ते 1995पर्यंत म्हणजे दोन वर्षच पवार मुख्यमंत्रीपदी होते. त्यानंतर पवार दिल्लीच्या राजकारणात गेले.