IPL Final खेळत नाही, तरी Dhoni च्या CSK साठी लकी ठरणार हा खेळाडू, 3 टीमना मिळालाय विजय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । आयपीएल 2021 ची फायनल (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत चेन्नईने तीनवेळा तर कोलकात्याने दोन वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आयपीएलचा हा 14 वा मोसम आहे, यातल्या 9 व्यांदा चेन्नईची टीम फायनलमध्ये खेळणार आहे. चेन्नईच्या या टीममध्ये असा एक खेळाडू आहे ज्याला लकी फॅक्टर समजलं जातं, त्याचं नाव आहे कर्ण शर्मा (Karn Sharma).

लेग स्पिन बॉलिंगशिवाय चांगली बॅटिंग करणाऱ्या कर्ण शर्माचं आयपीएल रेकॉर्ड फारसं चांगलं नाही, पण त्याची उपस्थिती अनेक टीमसाठी लकी ठरली आहे. याचं कारण मागच्या 5 आयपीएल मोसमांपैकी कर्ण शर्मा ज्या टीममध्ये होता ती टीम चारवेळा फायनलमध्ये पोहोचली. या चारपैकी तीनवेळा कर्ण शर्माची टीम आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर एकदा फायनलमध्ये त्याच्या टीमचा पराभव झाला.

2016 साली सुरू झाला लकी प्रवास

कर्ण शर्माने आपला पहिला आयपीएल सामना 2013 साली सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळला, पण 2016 साली हैदराबदला पहिल्यांदाच आणि एकमेव आयपीएल किताब मिळाला. यानंतरच्या मोसमात म्हणजेच 2017 साली कर्ण शर्मा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये आला, तेव्हा मुंबईन आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

पुढच्याच वर्षी कर्ण शर्माची टीम पुन्हा बदलली आणि दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने त्याला विकत घेतलं. या मोसमात चेन्नईने आणखी एक ट्रॉफी जिंकली. अशाप्रकारे लागोपाठ तीन आयपीएल जिंकणारा एकमेव खेळाडू व्हायचा मान कर्ण शर्माला मिळाला.

2019 सालीही धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची टीम आयपीएल फायनलला पोहोचली, पण मुंबई इंडियन्सने चेन्नईचा पराभव केला. लागोपाठ 4 आयपीएल फायनल खेळणाऱ्या टीमचा भाग असल्याचं रेकॉर्ड कर्ण शर्माच्या नावावर झालं. आता पुन्हा एकदा धोनीची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे आणि कर्ण शर्मा या टीमचा भाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *