महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । जवळपास चार महिने सक्रिय राहिलेल्या मॉन्सूनने अखेर विदर्भातून निरोप घेतला. मॉन्सूनने विदर्भातून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी केली. मात्र, जाता जाता वरुणराजाने सप्टेंबरमध्ये जोरदार दणका देऊन बळीराजाच्या आशेवर पाणी फेरले.
विदर्भात नऊ जूनला मॉन्सून दाखल झाला होता. चार महिन्यांच्या मुक्कामानंतर १२ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने अधिकृत निरोप घेतला. गेल्या दशकाचा विचार केल्यास मॉन्सून दुसऱ्यांदा लवकर माघारी परतला. यापूर्वी २०१८ मध्ये ६ ऑक्टोबरलाच मॉन्सूनची विदर्भातून ‘एक्झिट’ झाली होती. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाही विदर्भात सरासरी पाऊस झाला.
१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकूण ९६८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जी सरासरी पावसाच्या (९४३ मिलिमीटर) तीन टक्के अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे यावर्षी सर्वाधिक पाऊस सप्टेंबरमध्ये २९६.९ मिलिमीटर कोसळला. तर सर्वांत कमी पावसाची (१७४.५ मिलिमीटर) नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली.
विविध जिल्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदा सर्वाधिक पाऊस गोंदिया जिल्ह्यात १,१४० मिलिमीटर, तर सर्वांत कमी ६९९ मिलिमीटर पावसाची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली. नागपूर जिल्ह्यात पावसाने हजारी (१,०५० मिलिमीटर) पार केली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने बहुतांश धरणे तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचेही संकट टळले आहे.
पावसाळा अधिकृतपणे संपला असला तरी, अवकाळीचे सावट अजूनही कायम आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो पश्चिमोत्तर दिशेने सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.