महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । ऐन दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. जर भाज्या इतक्या महाग झाल्या तर खायचं काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
कांदे आधी 30 रुपये प्रति किलो होते ते आता 55 रुपये किलो झाले आहेत. बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो आधी 20 प्रति किलो होते ते आता थेट 80 रुपये किलो झाले आहेत.
भाजी आधीचा दर प्रति किलो वाढलेला दर प्रति किलो
शिमला मिर्ची 40 रुपये 80 रुपये
वांगी 35 रुपये 80 रुपये
गवार 40 रुपये 80 रुपये
भेंडी 30 रुपये 80 रुपये
कोथिंबीर 40 रुपये 70 रुपये
प्रत्येक भाज्यांमागे 30 ते 40 रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. वाशी येथील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर सध्या नागपुरात विकली जातेय. सध्या नागपूरातील किरकोळ बाजारात कोथिंबीरचा दर 320 ते 360 रुपये किलोंवर पोहोचलाय. लांबलेल्या पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झालीये. त्यामुळे आवक कमी झाल्याने सध्या राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपूरकरांना घ्यावी लागत आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझलचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहचलंय. अशात आता भाजीपाल्यानेही महागाईत भर घातलीये. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीरचा 250 ते 300 रुपये किलोचा दर सुरु आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आणि हातठेल्यांवर कोथिंबीर 320 ते 360 रुपये किलोने विकली जातेय.