महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । राज्यात आगामी माहापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालीय. अशावेळी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: महापालिकेसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पदाधिकारी मेळावा घेतलाय. त्यानंतर आता पुणे महापालिकेसाठी दिवाळीनंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Sharad Pawar will hold a meeting of NCP on the backdrop of Pune Municipal Corporation elections)
शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. त्याबाबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दिवाळीनंतरची राष्ट्रवादीची ही बैठक महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.