महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्त राहण्याचा अंदाज नाशिकमधील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीत सोन्याचा प्रतितोळा दर 51000 रुपये इतका होता. मात्र, यंदा सोन्याचा प्रतितोळा दर 47000 ते 47500 रुपये इतका असेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीप्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दसऱ्यानंतर देशभरात सोन्याचा भाव पुन्हा उसळी घेताना दिसत आहे. नाशिकच्या सराफा बाजारात रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49300 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46060 रुपये नोंदवले गेले.येत्या काही दिवसात सोन्याचा दर झपाट्याने वाढण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तवला आहे.
आता जोखीम संपली
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.