महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । देशात आलेली कोरोनाची दुसरी हळूहळू ओसरू लागली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाली आहे. चीन आणि ब्रिटनमध्ये मात्र कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे भारतानं वेगानं लसीकरण वेगानं पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
देशात राबवण्यात येत असलेल्या लसीकरण अभियानात ८० टक्के वाटा एकट्या कोविशील्डचा आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. दिल्लीत ८७ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण ४७ टक्के आहे. जोपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण वाढणार नाही, तोपर्यंत कोरोना संक्रमण आणि नव्या व्हेरिएंटचा धोका कायम राहील. हा धोका कमी करायचा असल्यास दुसरा डोस लवकर पूर्ण करायला हवा. त्यासाठी दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांवर आणायला हवं, असं तज्ज्ञांना वाटतं.