महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । पेट्रोल डिझेलच्या किंमती महिन्याभरात वेगाने वाढत असून अद्याप कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर १०८.६४ रुपये तर डिझेल ९७.३७ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.
सध्या मुंबईत पेट्रोलचे दर ११४.४७ रुपये तर डिझेल १०५.४९ रुपये इतके आहेत. चेन्नईत पेट्रोल १०५.४३ रुपये तर डिझेल १०१.५९ रुपये दराने विक्री होत आहे. कोलकात्यात १०९.१२ रुपये दराने पेट्रोल तर १००.४९ रुपये दराने डिझेलची विक्री होत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती सर्वाधिक भोपाळमध्ये आहेत. तिथे पेट्रोल ११७.३५ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०६.७६ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.
गेल्या महिन्यात २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महाग झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत २० वेळा इंधन तेलांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कच्च्या तेलांच्या किंमती 86 डॉलरवर पोहचल्या होत्या. २०१४ नंतर या उच्चांकी पातळीवर आहेत. यामुळेच सर्व पेट्रोलियम उत्पादने महाग होत आहेत. पेट्रोलच्या किंमती गेल्या महिन्याभरात ७.७५ रुपये प्रति लिटर वाढल्या आहेत. तर डिझेलच्या दरात ८.४५ रुपयांची वाढ झाली आहे.