महाराष्ट्र 24- नवी दिल्ली
केंद्र सरकारने पॅरॉसिटोमॉलसह औषध तयार करण्यासाठीच्या 26 फॉर्म्युलेशन्स तसेच अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल्स इन्ग्रेडिएंटस्च्या (एपीआय) निर्यातीवर बंदी घातली आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) मंगळवारी याबाबत अधिसूचना जारी केली असून तत्काळ प्रभावाने ती लागू करण्यात आली आहे. चीननंतर एकापाठोपाठ वेगवेगळ्या देशांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातही एका अवकाशानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणूनही हा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून वेळ पडल्यास देशात औषधांचा तुटवडा नको.
बहुतांश एपीआयसाठी भारत हा चीनवर अवलंबून असतो आणि नेमका तेथेच कोरोनाचा उद्भव असल्याने तेथील बहुतांश कारखाने बंद आहेत. तेथे उत्पादनच बंद असल्याने भारताला पुरवठ्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतात औषधे तयार होऊन मग ती जगभर निर्यात केली जातात. त्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. पॅरॉसिटोमॉल, टिनिडेझॉल, मेट्रोनायडेझॉल, एसायक्लोविर, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, प्रोजेस्टेरॉन, क्लोरेम्फेनिकॉल, इरिथ्रोमायसिन सॉल्ट, निओमायसिन, क्लिडांमायसिन सॉल्ट, ऑर्निडेझॉल, फॉर्म्युलेशन मेड ऑफ क्लोरेमफेनिकॉल, फॉर्म्युलेशन मेड ऑफ इरिथ्रोमायसिन सॉल्ट, फॉर्म्युलेशन मेड ऑफ क्लिडांमायसिन सॉल्ट, फॉर्म्युलेशन मेड ऑफ प्रोजेस्टेरॉन, फॉर्म्युलेशन मेड ऑफ व्हिटॅमिन बी1, फॉर्म्युलेशन मेड ऑफ व्हिटॅमिन बी12, फॉर्म्युलेशन मेड ऑफ व्हिटॅमिन बी6, फॉर्म्युलेशन मेड ऑफ निओमायसिन, फॉर्म्युलेशन मेड ऑफ ऑर्निडेझॉल, फॉर्म्युलेशन मेड ऑफ मेट्रोनायडेझॉल, फॉर्म्युलेशन मेड ऑफ टिनिडेझॉल, फॉर्म्युलेशन मेड ऑफ एसायक्लोविर, फॉर्म्युलेशन मेड ऑफ पॅरॉसिटोमॉल.
अमेरिकेतील मीडिया हाऊस ब्ल्युमबर्गच्या गत महिन्यातील अहवालानुसार चीनमधून पुरवठा बंद झाल्याने भारतात पॅरॉसिटोमॉल 40 टक्के महाग झाले आहे. विषाणूजन्य आजारांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्या अँटिबायोटिक एजिथ्रोमायसिनच्या किमती 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
भारत वर्षाला 25,200 कोटी रुपयांचे एपीआय (औषधे बनविण्यासाठीचा कच्चा माल) आयात करतो. यात 18,000 कोटी रुपयांचा म्हणजे जवळपास 70 टक्के माल चीनमधून आयात होतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चीनहून पुरवठा पूर्ववत झाला नाही तर संपूर्ण औषधे उद्योगावर घटक औषधांच्या टंचाईमुळे संकट ओढविणार आहे.