महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ नोव्हेबर । करोनाच्या संकटातून उद्योगधंदे सावरत असून मालमत्ता बाजारपेठाही स्थिरस्थावर होताना दिसत आहे. सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून परिणामी ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत आणि महसुलात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये राज्यात १ लाख ६ हजार ८३१ घरे विकली गेली असून यातून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला १ कोटी ८३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट आले आणि त्याचा मोठा फटका मालमत्ता बाजारपेठेला बसला. त्यामुळेच एप्रिल २०२० मध्ये राज्यात सर्वात कमी केवळ ७७८ इतकीच घरे विकली गेली होती. पुढे जसजशी परिस्थितीत सुधारणा होऊ लागली तसतशी मालमत्ता बाजारपेठही सावरत गेली. मात्र घरविक्रीत म्हणावी तशी वाढ होत नसल्याने, महसुलात घट होत असल्याने राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात सवलत लागू केली. याचा चांगला परिणाम सप्टेंबर २०२० मध्ये झाला आणि घरविक्रीचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊ लागला.
डिसेंबर २०२० मध्ये तर विक्रमी घरविक्री झाली. तब्बल २ लाख ५५ हजार ५१० घरे डिसेंबरमध्ये विकली गेली आणि यातून २ हजार २१२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळाला. करोनाकाळात केंद्र, राज्य सरकारने बांधकाम व्यावसायासंदर्भात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्याचा फायदा घरविक्रीला झाला.