महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेबर । दिवाळीच्या रोषणाईत कंदिलांप्रमाणेच दिव्यांच्या माळांनाही विशेष मागणी असते. आकर्षक आणि नाना प्रकारच्या चिनी माळांनी गेली अनेक वर्षे बाजारात वर्चस्व राखले होते. यंदाही चिनी उत्पादने मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. मात्र, तरीही ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या दिव्यांच्या माळांना अधिक मागणी मिळत आहे. मुंबई पट्टय़ातील स्वस्त उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या उल्हासनगरात ग्राहकांप्रमाणेच विक्रेत्यांनीही स्वदेशीला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षांत करोनाच्या संकटात ग्राहकांनी खिशाला हात लावत खरेदीवर मर्यादा आणली होती. यंदाच्या वर्षांत दिवाळीच्या पूर्वीच जवळपास सर्वच गोष्टींवरील र्निबध कमी केल्याने बाजार पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच बाजारात बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळते आहे. दिवाळीला काही दिवस शिल्लक असल्याने ग्राहकांनी बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी सुरू केली आहे. रोषणाईत महत्त्वाचा वाटा असलेल्या इलेक्ट्रिक माळा, दिवे यांच्या बाजारात ग्राहकांनी चांगली हजेरी लावली आहे. स्वस्त दरातील इलेक्ट्रिक बाजार म्हणून मुंबईनंतर उल्हासनगरचा बाजार ओळखला जातो. या बाजारातही विद्युत दिवे, माळा खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसते आहे. यंदाचा बाजार देशी उत्पादनांनी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून चिनी उत्पादनांची आवक घटल्याने देशी उत्पादनांना बाजारात स्थान मिळत आहे. या मालाच्या किमतीही तुलनेने कमी असल्याने ग्राहक या वस्तूंना पसंती देत आहेत.