महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेबर । ऑस्ट्रेलियामधील टीम इंडियाच्या कसोटी मालिका विजयाने इंग्लंडचा कर्णधार जो रूट खूप प्रभावित झाला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याने उर्वरित संघांनाही आत्मविश्वास मिळाला आहे, असे रूटला वाटते. भारताने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयात ऑस्ट्रेलियाचा गड मानल्या जाणाऱ्या गाबा कसोटीतील (Gaba Test) विजयाचाही समावेश आहे. (Ashes 2021 : We Now Know Gabba Isn’t A Stronghold for Australia, Joe Root Pointing To India’s historic Win)
गाबामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 33 वर्षांनंतर पराभूत केले. ब्रिस्बेनच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा होतो, मग त्यांच्यासमोर कोणताही संघ असो, ऑस्ट्रेलिया या मैदानात कधीच पराभूत झाली नाही. टीम इंडियाने त्यांचे वर्चस्व संपवले. भारताचा हा विजयसुद्धा खूप खास होता कारण या सामन्यात संघाचे बहुतेक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होते आणि खेळले नव्हते. भारताच्या या विजयाने आपल्या संघातील खेळाडूंचा उत्साह वाढला असून तो आता अधिक आत्मविश्वासाने अॅशेस मालिकेत उतरेल, असा विश्वास रूटला आहे.
टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना जो रूट म्हणाला, ‘टीम इंडियाकडे बघा, ते गाबा येथे जिंकले. त्यांच्याकडे त्यांची सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन नव्हती पण ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आणि कसोटी सामना जिंकला. यामुळे आमच्या संघातील खेळाडूंना खूप आत्मविश्वास मिळाला आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या मनात शंका निर्माण झाली आहे की त्यांना त्यांच्याच घरात कोणीतरी नमवले आहे. त्यामुळे ते बॅकफुटवर आहेत. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे आता ते वर्चस्व राहिलेले नाही.
द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत जो रूट म्हणाला की, बेन खेळत नसताना मी त्याच्याशी बोललो. त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला आणि मला त्याचे हसणे ऐकू आले. हे सगळं फोनवरून जाणवलं. तुम्ही म्हणू शकता की, तो आतून आनंदी होता. त्याने फक्त विचार केला की, तो अशा ठिकाणी आहे जिथे तो पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे, ही सर्वात रोमांचक गोष्ट आहे. मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर बेन स्टोक्स अॅशेस मालिकेतून पुनरागमन करत आहे. ब्रेकच्या काळात तो या सगळ्यांपासून दूर राहिला. मात्र, इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट त्याच्याशी बोलला आणि त्याने बेन स्टोक्ससोबत फोनवर झालेल्या संभाषणाची माहितीही दिली.