महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ नोव्हेबर । शुक्रवार, (ता. ०५ ) नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०७८ प्रमादीनाम संवत्सर, महावीर जैन संवत् २५४८ , गोवर्धन पूजा, अन्नकूट, वहीपूजन आहे. या दिवशी व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या वह्यांवर लेखनास प्रारंभ करतात. आणि या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला मौल्यवान वस्तूची भेट देतो. बलिप्रतिपदेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच या दिवशी बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर शुभ कार्याचा प्रारंभ करतात.
व्यापारीवर्गासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी वहीपूजन व वहीलेखनासाठी मुहूर्त…
शुक्रवार (ता. ०५) नोव्हेंबर २०२१ रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ६:४२ ते ८:०७ चल, सकाळी ८:०८ ते ९:३२ लाभ, सकाळी ९:३३ ते १०:५७ अमृत, दुपारी १२:२२ ते १:४७ शुभ आणि सायं. ४:३७ ते ६:०२ चल चौघडीमध्ये दिवाळी पाडव्याचे वहीपूजन व लेखन करावे.
बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पुढीलप्रमाणे बळीची प्रार्थना केली जाते.
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु ।
भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।।
” हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बलिराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असुरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर. ”
अशी प्रार्थना करून बळीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात.