महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ नोव्हेबर । सरकारी रुग्णालयांमधून सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण दिवाळीमध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. ४) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्याने केंद्रावर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी (ता. ५) सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार आहेत. त्यानंतर येत्या शनिवारी (ता. ६) आणि रविवारीदेखील (ता. ७) केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस तसेच, शुक्रवारी दुपार वगळून इतर दिवशी लस उपलब्ध आहे. दीपावलीमध्ये लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हा निर्णय बंद ठेवण्यात येणार आहे. शहरात लशीचा पहिला डोस शंभर टक्के पुणेकरांनी घेतला आहे. पुण्यात १८ पेक्षा जास्त वय असलेल्या २६ लाख ४५ हजार ७०० पात्र नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस राहिलेल्या नागरिकांपर्यंत पोचणे आणि दुसऱ्या डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.