२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड भारताचा मुख्य प्रशिक्षक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी केली. त्याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी म्हणजेच २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत असणार आहे.

द्रविड मागील काही वर्षे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख म्हणून कार्यरत होता. तसेच त्याने भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद भूषवताना उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या मार्गदर्शनात खेळलेले ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांसारखे युवा खेळाडू सध्याच्या भारतीय संघाचा भाग आहेत. त्यामुळे त्याने भारताचे प्रशिक्षकपद सांभाळावे अशी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची इच्छा होती. द्रविडची हे पद स्वीकारण्याची सुरुवातीला तयारी नव्हती. मात्र, गांगुली आणि शाह यांनी मागील महिन्यात इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यादरम्यान द्रविडशी संवाद साधून त्याचे मन वळवले.

द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर त्याची निवड निश्चित मानली जात होती. ‘‘सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंह यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने बुधवारी एकमताने राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून त्याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू होईल,’’ असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येईल.

राहुलने खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि तो सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. त्याने ‘एनसीए’चे अध्यक्षपदही यशस्वीरीत्या भूषवले. राहुलने ‘एनसीए’मध्ये कार्यरत असताना बऱ्याच युवा खेळाडूंना घडवले, ज्यांनी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आता तो त्याच्या नव्या भूमिकेत भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेईल अशी आशा आहे. -सौरव गांगुली, ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष

भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे आणि ही जबाबदारी सांभाळण्यासाठी मी उत्सुक आहे. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली असून या संघाला पुढे नेण्याची मला आशा आहे. -राहुल द्रविड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *