मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने फुलांचे भाव गडगडले ! झेंडू ३० रुपये, तर शेवंती ४० रुपये प्रतिकिलो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फुलांचे भाव गडगडले. गेल्या दिवाळीला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री झाली होती. मात्र बुधवारी दर गडगडल्याने झेंडू ३० रुपये प्रतिकिलो विकला जात होता. राज्यभरात फुलांचे मुबलक पीक आल्याने आवक वाढली असून झेंडूसह सर्वच फुलांचे दर कोसळल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांना काळजीने ग्रासले आहेत.

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला फुलांच्या मागणीत वाढ झाली आणि फुलांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळाला. दिवाळीतही फुलांना चांगला भाव मिळेल या उद्देशाने लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी झेंडूसह विविध फुलांची मोठय़ा प्रमाणावर मुंबईत आवक झाली. परिणामी झेंडू, शेवंती आदी महत्त्वाच्या फुलांचे भाव गडगडले. गेल्या वर्षी दिवाळीत झेंडू १०० रुपये प्रतिकिलोने विकला गेला होता. यंदा घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू ४० ते ५०, तर लहान आकाराचा झेंडू ३० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. एरव्ही शंभरी पार असणारी शेवंती बुधवारी ४० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होती.

‘फुलांना दर कमी मिळाल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पीक जास्त आल्याने नफ्याचे गणित बिघडून गेले,’ असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *