महाराष्ट्र 24 -श्रीनगर :
भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय सैन्याने हल्लीच अँटी टँक गायडेड मिसाईल आणि आर्टिलरी शेल्सचा वापर करत पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा सेक्टर समोरील पाकिस्तानी सैन्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. याबाबतचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे.
अँटी टँक गायडेड मिसाईलचे भारतीय लष्कराच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. शत्रूराष्ट्राच्या रणगाड्यांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. दुर्गम भागात शत्रूच्या रणगाड्यांना आणि ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य वाढविले आहे. भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रसाठ्यात विविध रॉकेट्स, मिसाइल्सपासून अत्याधुनिक टँक आणि आर्टिलरी शेल्सचा समावेश केला आहे.
पुलवामामध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात ‘जैश’चे तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.