महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ नोव्हेबर । भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अनेक चढ-उतार येत आहेत. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) आणि चौथा सामना स्कॉटलंडविरुद्ध (India vs Scotland) जिंकत भारताने पुनरागमन करण्याचा प्रयत्न तर केला आहे. पण सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी गणित थोडं वेगळं आहे
स्कॉटलंडला मात दिल्यानंतर भारत 2 विजयांसह 4 गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. नेट-रनरेटच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला मागे टाकलं आहे. तसं पाहायाला गेलं तर भारताचा रनरेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षाही अधिक आहे. पण पाकिस्तान 4 पैकी 4 सामने जिंकत याआधीच पुढील फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ जर त्यांचा सुपर 12 मधील शेवटचा सामना अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला तर तो केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिल. ज्यानंतर भारतही नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवून गुणतालिकेत असेल. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास उत्तर रनरेटच्या जोरावर भारतचं पुढील फेरीत जाईल. पण या सर्वासाठी मूळात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मात देणं गरजेचं आहे.
‘हा’ रविवार तरी भारताला आनंददायी असणार का?
यंदाच्या विश्वचषकातील पहिले दोन्ही रविवार भारतीयांसाठी निराशामय होते. पहिल्या रविवारी 24 ऑक्टोबरला पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सनी मात दिली. मग दुसऱ्या रविवारी 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिली. त्यानंतर भारताने 2 विजय मिळवले असले तरी येणाऱ्या रविवारी (7 नोव्हेंबर) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाच भारताचं विश्वचषकातील भविष्य ठरवणार आहे. सध्या तरी सर्व भारतीयांच्या नजरा न्यूझीलंडस अफगाणिस्तान सामन्याकडे आहेत. ही लढत रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.