महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । कोरोनाच्या साथीतून यंदा थोडा दिलासा मिळाला असल्याने देशात दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी झाली. यावेळच्या दिवाळीत देशभरात १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली. विशेष म्हणजे स्वदेशी वस्तूंना (व्होकल फॉर लोकल) नागरिकांनी प्राधान्य दिले. यामुळे चीनला ५० हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे, असा दावा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) शुक्रवारी (ता. ५) केला. गेल्या दहा वर्षांतील ही विक्रमी विक्री असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावर्षीच्या दिवाळीत सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांची विक्री झाली असल्याचा दावा ‘सीएआयटी’चे अध्यक्ष बी.सी भरतिया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन संस्थेने गेल्या वर्षी केले होते, असे त्यांनी सांगितले. त्याला ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यानेच यंदा दिवाळीत चीनी बाजारपेठेचे ५० हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी दिवाळीच्या काळात छोटे कारागीर, कुंभार, शिल्पकार आणि स्थानिक कलाकारांच्या उत्पादनांची चांगली विक्री झाली, असेही भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितले.