महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । दिवाळीत मालमत्ता बाजारपेठेत खरेदीच्या उत्साहाचे चित्र आहे. गृहविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात दिवाळीच्या केवळ तीन दिवसांत राज्यात १७ हजार ३७० घरे विकली गेली. त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रूपात ३११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. महत्त्वाचे म्हणजे यातील १०२ कोटींचा महसूल एकट्या मुंबई आणि आसपासच्या परिसरातून मिळाला.
दिवाळीत दरवर्षी गृहखरेदी-विक्री सर्वाधिक वाढते. यंदाही राज्यात दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळाला असून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार दिवाळीच्या १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान १७ हजार ३७० घरांची विक्री झाली. त्यातून सरकारला ३११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. हे आकडे समाधानकारक मानले जात आहे.
करोनाकाळात मोठे आणि हक्काचे घर असणे ही गरज झाली आहे. त्यात गृहकर्जाचे व्याजदरही कमी झाले आहेत. करोनाचे सावट हळूहळू कमी होत असून परिस्थिती सुधारत आहे. परिणामी, याचा फायदा बांधकाम व्यवसायालाही होत आहे, असे विकासक नयन शहा यांनी सांगितले.
सर्वाधिक नोंदणी मुंबईत
राज्यात विक्री झालेल्या १७,३७० घरांपैकी १,४४१ घरे मुंबईतील आहेत. ३११ कोटींपैकी १०२ कोटींचा महसूल सरकारला केवळ मुंबईतून मिळाला आहे. एकीकडे गृहविक्रीत वाढ झाली आहेच, पण त्याच वेळी दिवाळीत गृहनोंदणी, घरांबाबत चौकशी, ताबा आणि गृहप्रवेश अशा व्यवहारातही वाढ झाली आहे. अनेक विकासकांनीही आपल्या नवीन प्रकल्पाचा आरंभ केला आहे. करोनाचा फटका बसलेल्या मालमत्ता बाजारपेठेला दिवाळीच्या निमित्ताने चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे.
दिवाळीच्या तीन दिवसांत चांगली विक्री झाली. घरविक्रीत दिवसेंदिवस वाढ होत असून पुढेही असेच चित्र कायम असेल. – नयन शहा, विकासक