महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) 8 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. न्यूझीलंडच्या विजयाबरोबर टीम इंडियाच्या सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आणि भारतीय टीम स्पर्धेतून बाहेर पडली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये ही शेवटची टी20 स्पर्धा होती. ही स्पर्धा जिंकत विजयी निरोप घेण्याचं विराटचं स्वप्न अधुरं राहिलं.
न्यूझीलंडनं विराट कोहली आणि टीम इंडियाचं स्वप्न भंग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सलग तीन आयसीसी स्पर्धेत केन विल्यमसनच्या न्यूझीलंडनं टीम इंडियाचं विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं आहे. इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानं पहिल्या क्रमांकासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी न्यूझीलंडनंच त्यांचा पराभव केला होता. या वर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्येही न्यूझीलंडनं टीम इंडियाला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.
आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा शेवटचा पराभव 2003 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये केला होता. त्यानंतर गेल्या 18 वर्षात टीम इंडियाला एकही विजय मिळवता आलेला नाही.