महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । एसटी कामगारांचा संप चिघळला असून, रविवारी राज्यातील १२९ आगारांतील कामगारांनी बंद पाळला. संपाला १७ कामगार संघटनांच्या कृती समितीचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, संघर्ष कामगार युनियननेही ‘संपूर्ण बंद’ची हाक दिल्याने आज, सोमवारपासून राज्यभर एसटी सेवा ठप्प होण्याची भीती आहे.
एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्याविषयी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईत कृती समितीची बैठक होणार आहे. समितीत नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सर्व आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे. राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी करत एसटीतील छोटय़ा-मोठय़ा १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू के ले. त्यापाठोपाठ २८ ऑक्टोबरला कामगारांनी उत्स्फूर्त संपही सुरू केला. परिणामी, राज्यातील ७० टक्क्य़ांहून अधिक एसटी सेवा कोलमडली. एसटी महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्याबरोबरच वार्षिक वेतनवाढ आणि विलीनीकरणाच्या मागणीवर दिवाळीनंतर चर्चेचे आश्वासन दिले. त्यामुळे समितीने उपोषण आणि संप मागे घेतला; परंतु काही आगारांमधील कामगारांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या मागणीसाठी संप सुरू केला. हे आंदोलन पसरल्याने रविवारी राज्यातील १२९ आगारांतील कामकाज बंद पडले. त्यात मुंबईतील आगारांचाही समावेश होता.
उच्च न्यायालयाने संप न करण्याचे आदेश देऊनही कर्मचारी संघटनेने त्याकडे दुर्लक्ष करून पहिल्या दोन सुनावण्यांकडे पाठ फिरवली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी सरकारला प्रतिवादी केले. सरकारनेही कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अर्थ व परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांची विशेष समिती स्थापन करण्याचे आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात तूर्त कोणताही आदेश देत नसल्याचे स्पष्ट करत राज्याच्या महाधिवक्त्यांना सोमवारी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.