परतीच्या पावसाचा भात लागवडीला फटका ; दरांत दहा ते १५ टक्के वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । परतीच्या पावसाचा भात लागवडीला फटका बसला असून यंदाच्या हंगामात ८ ते १० टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. हरियाणा, पंजाबमधून बासमती तांदळाची आवक सुरू झाली असून इंधन दरवाढीमुळे माल वाहतूकदारांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला बासमती तांदळाच्या दरात १० ते १५ टक्यांनी वाढ झाली आहे.

बासमती तांदळात पारंपरिक, ११२१, १५०९, १४०१ असे चार मुख्य प्रकार आहेत. ११२१, १५०९, १४०१ या प्रकारांतील बासमती तांदळाचा वापर विवाह समारंभ, उपाहारगृहात केला जातो. बासमती तांदळाच्या मागणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत असून बासमती तुकडा तांदळाची निर्यात वाढलेली आहे. त्यामुळे बासमती तुकडा तांदळाच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे, असे मार्केटयार्डातील बासमती तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कंटेनरचे भाडे कमी होत असल्याने निर्यातीला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

१५ ते १७ लाख टन बासमती तांदूळ देशात विकला जातो. दरवर्षी बासमतीचे उत्पादन ७० ते ७५ लाख टन एवढे होते. गेल्या वर्षी ११२१ तांदळाचे दर ७० ते ७५ रुपये किलो असा होता. यंदाच्या वर्षी ११२१ या प्रकारातील बासमतीचे दर ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो असे आहेत

– राजेंद्र बाठिया, तांदूळ व्यापारी, मार्केटयार्ड

डिसेंबर महिन्यात बासमती तसेच अन्य तांदळाची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू होते. तेव्हा बासमती तांदळाचे निश्चित उत्पादन किती झाले, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकेल तसेच बासमतीचे दरही ठरतील.

– राजेश शहा, तांदूळ व्यापारी, जयराज अँड कंपनी, मार्केटयार्ड,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *