महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अचूकरित्या समजावी आणि विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने महा स्टुडन्ट ॲप (maha student app) तयार केले आहे. आठवडाभरात राज्यातील सर्व शाळांमध्ये हे ॲप लागू करण्यात येणार आहे.
आतापर्यंत शाळांमध्ये विद्यार्थी अथवा शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जात आहे. यापुढे अचूक आणि योग्य माहिती मिळावी यासाठी महा स्टुडन्ट ॲपद्वारे (maha student app) उपस्थिती नोंदवली जाणार आहे. ही माहिती सतत अद्ययावत केली जाणार आहे.
महा स्टुडन्ट ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अचूक उपस्थिती याची माहिती मिळणार आहे. यामुळे शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना मिळाला अथवा नाही याबाबत स्पष्टता येणार आहे. कित्येक शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी केली जाते. ही नोंदणी आता या ॲपमुळे करता येणार नाही.
एका शाळेतील विद्यार्थ्यांची दुसऱ्या शाळेत नोंद होणार नाही. त्यामुळे बोगस पटनोंदणीला आळा बसणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळामध्ये अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवरही यामुळे चाप बसेल, असा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने केला आहे.