महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ नोव्हेबर । तुम्हीही कॉफी पित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कॉफी केवळ झटपट ऊर्जा वाढवते असं नाही तर, ती आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यातही ब्लॅक कॉफीचं वेगळेपण खास आहे. वेबएमडीच्या बातमीनुसार, ब्लॅक कॉफीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. हिवाळ्यात कॉफीमुळं (Coffee in Winter) सर्दीपासून आराम मिळतो आणि मूडही फ्रेश होतो. एका संशोधनानुसार, दररोज 3 ते 4 कप कॉफी पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. सुस्ती आणि आळस दूर करण्यासाठीही कॉफी उपयुक्त आहे. तसंच कॉफीमधील कॅफिनचे गुणधर्म मूड चांगला करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊ, कॉफी पिण्याचे कोणते फायदे (Health benefits of black coffee) आहेत.
कॉफीमुळे अल्झायमरचा (Alzheimer) धोका होतो कमी
ब्लॅक कॉफी प्यायल्यानं अल्झायमर रोगाचा धोका खूप कमी होतो. वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होऊ लागते. हा त्रास वाढला तर अल्झायमर किंवा पार्किन्सन्सचा धोका वाढतो. संशोधनानुसार, रोज सकाळी एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्यानं स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच मेंदूची कार्यक्षमताही वाढते. कॉफी दिवसभर मेंदू आणि नसा सक्रिय ठेवण्यास मदत करते.
कॉफीमुळे सिरोसिसचा (Cirrhosis) धोका होतो कमी
यकृताच्या सिरोसिसमुळे दरवर्षी 31 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ब्लॅक कॉफी प्यायल्यानं सिरोसिसचा धोका कमी होतो, असं एका अभ्यासात आढळून आलं आहे. विशेषतः अल्कोहोलमुळं होणाऱ्या सिरोसिसचा धोका कॉफीमुळं कमी होतो. अभ्यासात असे आढळून आलंय की, दररोज चार किंवा अधिक कप कॉफी प्यायल्यानं अल्कोहोलिक सिरोसिसचा धोका 80 टक्क्यांपर्यंत कमी होतो. याशिवाय नॉन-अल्कोहोलिक सिरोसिसचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.
वेगानं ऊर्जा मिळण्यासाठी कॉफी आहे प्रभावी
ब्लॅक कॉफीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती शरीरात लवकर ऊर्जा निर्माण करते. म्हणून, जेव्हा शारीरिक हालचालींदरम्यान उर्जेची अधिक आवश्यकता असते, तेव्हा ब्लॅक कॉफी खूप उपयुक्त आहे. कॉफीमध्ये कॅफिन आढळतं. वर्कआउट करण्यापूर्वी ती थोड्या प्रमाणात प्यायल्याने ऊर्जा मिळते. ब्लॅक कॉफी रक्तातील एपिनेफ्रिन/एड्रेनालाईनची पातळी वाढवते, जी शरीराला व्यायामासाठी किंवा क्रियांसाठी तयार करते.