महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । एरवी खुर्चीवरून कायम एकमेकांवर टीका-टिप्पणी करणारे शिवसेना नेते संजय राऊत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ शनिवारी (दि.२०) एकाच सोफ्यात बसल्याचे दिसले. कुठली राजकीय घडामोड किंवा निर्णयासाठी ते एकत्र बसले नव्हते, तर हा याेग हाेता भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा.
त्र्यंबक रोडवरील एका रिसॉर्टमध्ये आयोजित सोहळ्यासाठी सर्वपक्षीय मंडळींनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्यात प्रवेश करण्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगली टीका केली. शेतकरी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवरही त्यांनी उपरोधिकपणे टीका केली.
अन् लागलीच लग्नाच्या मंडपात प्रवेश करताच तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे दोन्ही ज्या सोफ्यात बसले त्याच सोफ्यात राऊत भुजबळांच्या शेजारी जाऊन बसले. बसताच पाटील अन् राऊत यांच्यातच गप्पा रंगल्या. या गप्पा नेमक्या कुठल्या, त्यांचा चर्चेतील विषय कुठला या कुतूहलाने उपस्थितही त्यांच्याकडेच कान लावून दिसत हाेते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील निधीच्या वादात राऊतांनीच समन्वय घडवून आणला होता. अन् राऊत-भुजबळ शेजारीच बसल्याने त्याबाबतही खमंग चर्चा सुरू होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या सोहळ्याला हजर होते.
हा कौटुंबिक सोहळा
हा पक्षाचा सोहळा नाही. कौटुंबिक सोहळा आहे. आम्ही कुठेही सुडाचे राजकारण करत नाही. आम्हाला सन्मानाने बोलावले तिथे आम्ही जातो अन् राजकारण करायचे तेथेच करतो. येथे मला आमदार फरांदेंनी बोलावले हाेते. – खा. संजय राऊत, शिवसेना नेते