महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । जग कुठे संपतेय, जगाचे टोक कुठे आहे हे प्रश्न नक्कीच तुमच्या मनात कधी ना कधी तरी आले असतील. जगाचे टोक कुठे आहे हे माहिती नसले तरीही एक असा रस्ता अवश्य आहे, ज्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे मानण्यात येते. या रस्त्याचे नाव ई-69 आहे. ई-69 रस्त्याला जगातील सर्वात अखेरचा रस्ता मानण्यात येते. ई-69 एक महामार्ग असून तो सुमारे 14 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर अशा अनेक जागा आहेत, जेथे एकटय़ाने पायी चालणे किंवा गाडी चालविण्यास मनाई आहे.
नॉर्वेचे हे अंतिम टोक असून येथून जाणारा रस्ताच जगातील अखेरचा रस्ता मानण्यात येतो. ई-69 रस्ता पृथ्वीचे टोक आणि नॉर्वेला जोडणार आहे. या रस्त्याच्या पुढे कुठलाच रस्ता नाही. केवळ बर्फ आणि समुद्रच समुद्र दिसून येतो.
जगातील अखेरचा रस्ता असल्याने लोक तेथे जाऊ इच्छितात, पण तेथे एकटय़ाने जाणे किंवा ड्रायव्हिंग करण्यावर बंदी आहे. जर तुम्हाला जगातील अखेरच्या रस्त्याची सैर करायची असल्यास समुहात जावे लागेल. सर्वत्र बर्फच बर्फ असल्याने येथे जाणारे अनेकदा वाट चुकतात. याचबरोबर तेथे अत्याधिक थंडी असल्याने 14 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर कुणीच एकटा जात नाही.
हा रस्ता उत्तर ध्रूवानजीक असल्याने तेथे हिवाळय़ात केवळ रात्रच असते. तर उन्हाळय़ात तेथे सूर्य कधीच अस्ताला जात नाही. तेथे कधीकधी 6 महिन्यांपर्यंत सूर्याचे दर्शन घडत नाही. म्हणजेच 6 महिन्यांपर्यंत लोक रात्रीच्या काळोखातच राहतात. उन्हाळय़ात येथील तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास असते. तर थंडीत हे उणे 45 अंशांपर्यंत खालावते.