महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ नोव्हेबर । हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात पाऊस सुरु आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक प्रदेशात पाऊसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रातही पाऊसाची संततधार आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवेच्या वरच्या थरातील चक्राकार सिस्टिममधून द्रोणीय स्थितीजन्य परिस्थिती महाराष्ट्रपर्यंत आहे. परिणामी पुढील 2 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी २१ आणि २२ नोव्हेंबरला अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टी आणि येथील काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गडगडटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे.
राज्यात अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी भातकापणीची कामे सुरु आहेत. या कामात पावसामुळे व्यत्यय येत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र तंबाखू शेतीसाठी हा पाऊस फायद्याचा असल्याने या क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसाळी वातावरणाने या भागात अजूनही थंडीची चाहूल लागलेली नाही.