आजपासून शाळा सुरू ; एसटी संपामुळे विद्यार्थ्यांचीही अडचण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ नोव्हेबर । दिवाळीच्या सुट्टीच्या वादानंतर अखेर आज, सोमवारपासून राज्यातील बहुतांश शाळा सुरू होत आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे.

दिवाळीपूर्वी ग्रामीण भागांत पाचवीपासून, तर शहरी भागांत आठवीपासूनचे प्रत्यक्ष वर्ग (ऑफलाइन) सुरू करण्यात आले. मात्र, त्यानंतर सहामाही परीक्षा आणि नंतर दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळा बंद झाल्या. राज्यातील बहुतांशी शाळांतील वर्ग सोमवारपासून (२२ नोव्हेंबर) नियमित सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागते. एसटी बस ही या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तरी शाळेपर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.

खासगी वाहने धोकादायक

सध्या ग्रामीण भागांतील वाहतूकीची भिस्त प्रामुख्याने खासगी वाहनांवर आहे. छोटी खासगी वाहने, वडाप ही प्रवासाची साधने आहेत. खासगी वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते. पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालूून प्रवास करावा लागतो. शिवाय सध्या प्रवासासाठी अधिक भाडे घेऊन खासगी वाहनचालक प्रवाशांना लूटत आहेत.

खर्चही अधिक : अनेक विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी २० ते २५ रुपये खर्च करणेही शक्य नसते. एसटी प्रवासासाठी विद्यार्थ्यांना सवलत मिळते, त्यामुळेही शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असेल, असे लातूर येथील एका शिक्षकांनी सांगितले.

शहरातही शाळा बस बंदच

शहरी भागांतील विद्यार्थ्यांची वाहतूक प्रामुख्याने शाळेच्या बसमधून होते. मात्र, सध्या शाळा बस सुरू झालेल्या नाहीत. बसच्या शुल्कवाढीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांतील विद्यार्थ्यांपुढेही प्रवासाचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *