महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ नोव्हेबर । मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील सर्व शाळा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे पुन्हा गजबजणार आहेत. शाळेचे तोंड न पाहिलेल्या ग्रामीण तसेच शहरी भागातील पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना आता शाळेत जाता येणार आहे. येत्या बुधवार, 1 डिसेंबरपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असून शहरी भागात पहिली ते सातवी तर ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. पाल्याला शाळेत पाठविण्याचा निर्णय मात्र पालकांचाच असणार असून पालकांनी संमतीपत्र दिल्यावर विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार आहे.
राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यास आरोग्य विभाग, चाइल्ड टास्क फोर्सने याआधीच हिरवा कंदील दिला होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय होणार होता. अखेर गुरुवारी शाळा उघडण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. राज्यात यापूर्वी शहरी भागात आठवी ते बारावी तसेच ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यावेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना सविस्तर असून शाळांसाठी खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येणार आहेत. तसेच शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासनांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला जाणार आहे.
# मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ञांकडून व्यक्त होत होती.
# पहिलीतील विद्यार्थ्यांनी अद्याप शाळाच पाहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधून मुलांसाठी पोषक वातावरण तयार करण्यात येणार.
# पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होईपर्यंत नियम व अटी पाळून शाळा सुरू होतील.
# लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारच्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच निर्णय घेतला जाणार
राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर 1 डिसेंबरपासून राज्यातील बारावीपर्यंतच्या सरसकट सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील. शाळांना तयारीच्या दृष्टीने वेळ मिळावा यासाठी आठवडाभराचा वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱयांसोबत बैठकही घेण्यात येईल. पालक व इतर घटकांनीदेखील कोरोना प्रतिबंधक सूचना द्याव्यात. आरोग्यमय वातावरण सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री