महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ नोव्हेबर । कोरोना रुग्णसंख्येतील घसरणीमुळे देश महामारीतून सावरतोय असे चित्र दिसत असतानाच या विषाणूच्या तिसऱया लाटेची धास्ती वाढली आहे. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची कमी संख्या नोंद होत असली तरी मृत्युदरात मोठी वाढ झाली आहे. मागील नऊ दिवसांत कोरोनाचा मृत्युदर तब्बल 121 टक्क्यांनी वाढला आहे. अशातच 13 राज्यांना तिसऱया लाटेचा धोका असल्याचा इशारा देत केंद्र सरकार ‘अॅलर्ट मोड’वर आले आहे. संबंधित राज्यांना विशेष खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेने देशाला बेजार करून सोडले होते. त्यानंतर रुग्णवाढीचा दर कमी झाला. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले. या मोकळीकचा लाभ घेत नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लागले. अशा गर्दीतून कोरोनाच्या तिसऱया लाटेला निमंत्रण मिळणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे. याचदरम्यान अनेक राज्यांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केल्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. चाचण्या कमी झालेल्या 13 राज्यांना कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका अधिक असल्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांना पत्र लिहून तिसऱया लाटेची भीती व्यक्त केली आहे. तसेच कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.
तिसऱया लाटेने भारताची धडधड वाढली असतानाच कोरोनाचा नवीन घातक व्हेरिएंट काही देशांमध्ये हातपाय पसरू लागला आहे. अत्यंत जास्त प्रमाणात उत्परिवर्तन असलेला हा व्हेरिएंट इम्युनिटीवरही आघात करतो आहे. त्यामुळे कोरोनाच्या आणखी लाटा धडकण्याची भीती आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेसह तीन देशांमध्ये या घातक व्हेरिएंटचे केवळ 10 रुग्ण आढळले आहेत. मात्र ‘स्पाइक प्रोटीन’मध्ये बी.1.1.529 व्हेरिएंटचे 32 उत्परिवर्तन आहेत. त्यामुळे शास्त्र्ाज्ञांमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात 15 नोव्हेंबरला 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात तब्बल 121 टक्क्यांची वाढ होऊन 23 नोव्हेंबरला 437 कोरोनाबळींची नोंद झाली.
कर्नाटकातील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे 66 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोसदेखील घेतलेले आहेत.उत्तराखंडमध्ये फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या 11 आयएफएस अधिकाऱयांना कोरोना झाला आहे. त्यानंतर 48 अधिकाऱयांना ‘आयसोलेट’ केले आहे.
गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा वाढला आहे. बंगालमध्ये 2.1 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. इथे टेस्टिंगही घटल्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे.