‘पांच सौ देना रे’ या पोलिसाच्या आदेशावर ट्रकचालकाच्या वेशातले आमदार चव्हाण म्हणाले,…..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ नोव्हेबर । पांच सौ देना रे’ रात्रीच्या अंधारात ट्रकच्या हेडलाइटच्या उजेडात एक पोलिस बॅटरी चमकवत ट्रकजवळ येतो आणि हुकूम फर्मावतो. ‘पांच सौ नहीं, थोडा कम लेना’ असे म्हणत ट्रकचालक पोलिसाच्या हातात ५०० रुपयांची नोट ठेवतो. पोलिस जाऊ लागतो तसा ‘ए भाई, पांच सौ मत लेना, थोडा कम लेना’ म्हणत ट्रकचालक विनंती करतोय; पण संबंधित पोलिस पुढे निघून जातो.

‘ए, अरे, थोडा कम लेना भाई. गरीब आदमी हूँ’ ट्रकचालक ओरडून विनंती करतो तसा तो पोलिस पुन्हा ट्रकजवळ येतो आणि ‘चल ले’ असे म्हणत १०० रुपये ट्रकचालकाला परत देतो. तरीही ट्रकचालकाची विनंती सुरूच; पण पोलिस दुर्लक्ष करीत निघून जातो. तिथे उभा असलेल्या एका पोलिसाला उद्देशून ट्रकचालक ‘याला कमी पैसे घ्यायला सांग’ असे हिंदीत विनवतो. मग तो पहिला पोलिस येऊन आणखी एक ५० रुपयांची नोट परत देतो. ट्रक चालकाचे पैसे परत मागणे सुरूच. तसा तो पोलिस एक अस्सल पोलिसी शिवी ट्रकचालकाला हासडतो आणि ट्रक पुढे घ्यायचे आदेश देतो. ही शिवी ऐकताच ट्रकचालक संतापतो आणि मराठीत बोलू लागतो. ट्रकचा दरवाजा उघडून खाली उतरत विचारतो,’ए, शिवी कोणाला देतो रे तू? ’ चेहऱ्याला गुंडाळलेला पांढरा रुमाल सोडतो तसे तिथे उभे असलेले सर्वच पोलिस पळून जायचा प्रयत्न करतात. हा ट्रकचालक ओरडतो, ‘ए, कुठे पळतात? पकडा रे त्यांना. शूटिंग करा यांचे.’ तिथे असलेले इतर लोकं पोलिसांच्या मागे पळू लागतात. पुढे पोलिस आणि त्यांच्या मागे तरुण. त्यातले दोघेजण या तरुणांच्या हाती लागतात तसे ते पोलिस चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागतात. कारण पोलिसाला ५०० रुपयांची नोट देणारा तो ट्रकचालक म्हणजे आपल्याच तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण आहे हे त्या पोलिसांनी ओळखलेले असते.

बुधवारी मध्यरात्र ते गुरुवारची पहाट या वेळेत चाळीसगाव ते कन्नड या औट्रम घाटात हा नाट्यमय प्रसंग घडला. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे भाजपचे आमदार आहेत. दुरुस्तीसाठी दुसऱ्यांदा अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला हा घाट त्याच रात्री आठ वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत खुला करण्यात आला होता. तिथे ट्रकचालकांकडून पोलिस पैसे घेत आहेत ही माहिती मिळाल्यामुळे ट्रकचालकाचा वेष करून आमदार रात्री १२ वाजेनंतर घाटापर्यंत गेले आणि तिथून एका ट्रकमध्ये बसून स्टिअरिंग आपल्या हातात घेतले. पुढे हा प्रसंग त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मोबाइलमध्ये चित्रित केला.

कार्यकर्त्यांनी पकडलेल्या पोलिसांना आमदारांनी ओळख विचारली. त्यातले दोघे चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी होते. एकाला पोलिस स्टेशन सांगता आले नाही. मग तो ‘झीरो पोलिस’ असल्याचा निष्कर्ष काढला गेला. त्यानेही ते मान्य केले.

सर्व व्हिडिओ एसपींकडे
– तयार झालेले हे सर्व व्हिडिओ घेऊन आमदार चव्हाण गुरुवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांना भेटले.
– चाळीसगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह रात्री ड्यूटीवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तातडीने चौकशी करून शुक्रवारपर्यंत कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी आमदारांना दिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *