कोरोना व्हायरसचा संसर्ग पुरुषांनाच होण्याचा धोका अधिक?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली –
चायनीज सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल याविषयीची पाहणी केली आणि त्यातून ही माहिती मिळाली आहे. कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालेल्या 44,000 लोकांबाबत हा अभ्यास करण्यात आला. यापैकी 2.8% पुरुष आणि 1.7% महिलांचा मृत्यू झाला. वयाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर विषाणू संसर्ग झालेल्या 0.2% लहान मुलं आणि तरुणांचा मृत्यू झाला. तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 15% लोकांचा मृत्यू झाला आहे.

म्हणजे महिला आणि मुलांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती कमी असल्याचं या आकडेवारीवरून म्हणायचं का?

संसर्गाचा प्रतिकार करण्याची शक्ती

महिला आणि मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी आहे किंवा त्यांचं शरीर या विषाणूशी अधिक चांगल्या पद्धतीने लढतं, हे याचं एक कारण असू शकतं.
युनिव्हर्सिटी ऑफ एक्स्टरचे डॉक्टर भरत पनखनिया सांगतात, “सहसा नवीन विषाणूचा सगळ्यांनाच संसर्ग होतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.”
या विषाणूशी लढण्यासाठीची प्रतिकारक शक्ती नसल्याने असं होतं. पण जेव्हा एखादा विषाणू पसरू लागतो, तेव्हा मुलांना त्याची कमी लागण होते.
किंग्स कॉलेज लंडनच्या डॉक्टर नॅटली मॅकडरमट सांगतात, “पालक मुलांची काळजी जास्त घेतात, त्यांना धोक्यांपासून दूर ठेवतात म्हणून मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी असू शकतं. ”
महिलांचं काय?

कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी आहे. पण संशोधकांना याचं आश्चर्य वाटत नाही.
फ्लूसह इतर संसर्गांबाबतही हेच पहायला मिळतं. जीवनशैलीमुळे पुरुषांची तब्येत ही महिलांच्या तुलनेत खराब असते. धूम्रपान आणि दारू पिण्याचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतं.
डॉक्टर मॅकटरमट सांगतात, “धूम्रपानामुळे तुमच्या फुफ्फुसांचं नुकसान होतं आणि ही चांगली बाब नाही.”

चीनबाबत हे जास्त लागू असण्याची शक्यता आहे कारण एका आकडेवारीनुसार इथे धूम्रपानाचं प्रमाण पुरुषांमध्ये 52% तर महिलांमध्ये 3% आहे.
पण सोबत पुरुष आणि महिलांमधली रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या संसर्गाला कसं प्रत्युत्तर देते, यावरही हे अवलंबून आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लीयचे प्राध्यापक पॉल हंटर सांगतात, “महिलांची रोग प्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. ऑटो इम्यून डिसीजेस (रोग प्रतिकारक यंत्रणा अति सक्रीय झाल्याने होणारे आजार) होण्याचा धोका महिलांना जास्त असतो.”

गर्भारपणात किती धोका
ढोबळपणे याचं उत्तर आहे – नाही. पण याविषयी तज्ज्ञांमध्ये दुमत आहे.
गर्भावस्थेत शरीरात भरपूर बदल घडत असतात. यादरम्यान रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि म्हणून आईचं शरीर भ्रूण गर्भाशयात स्वीकार करू शकतं.
म्हणूनच गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. आपल्याच वयाच्या महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलांचा फ्लूमुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. पण गर्भवती महिलांवर कोरोनाव्हायरसचा गंभीर परिणाम होत असल्याचे ‘ठोस पुरावे मिळाले नसल्याचं’ ब्रिटीश सरकारचं म्हणणं आहे. प्रोफेसर हंटर म्हणतात, “माझा यावर पूर्ण विश्वास नाही. फक्त 9 गर्भवती महिलांद्वारे मिळालेल्या आकडेवारीवर हे आधारित असल्याने सगळंकाही ठीक आहे असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. जर माझ्या पत्नीबाबत बोलायचं झालं तर मी तिला खबरदारी घ्यायचा, हात धुवायचा आणि काळजी घ्यायचा सल्ला देईन.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *