महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची कर्नाटक सीमेवर तपासणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । करोना विषाणूचा नवा प्रकार अधिक घातक असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कर्नाटकासह इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना करोना प्रतिबंधक दोन लस घेतलेले प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर अहवाल प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतर राज्यातून आणि पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कर्नाटक राज्यात प्रवेश करताना कोगनोळी नाका येथे करोना नियमावली लागू केली आहे. आता करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी करोनाचे नियम कोल्हापूर जिल्ह्यात अधिक कडक करण्यात येणार आहेत. ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने संसर्गाचा धोका लक्षात घेऊन उपाय योजना केल्या आहेत. मुखपट्टी नाही तर प्रवेश नाही हा उपक्रमाच्या धर्तीवर जिल्ह्यात लस नाही, मुखपट्टी नाही तर प्रवेश नाही ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेखावार यांनी दिली.

कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम, प्रवास, खरेदी करताना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. लसीचा दुसरा डोस घेऊन किमान चौदा दिवसांचा अवधी झाला पाहिजे. नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. शाळा सुरू ठेवणे संदर्भात राज्य शासनाकडून जे मार्गदर्शन येईल, त्यानुसार निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *