महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, १ डिसेंबरपासून अनेक नियमात बदल होणार आहे. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरची एलपीजी किंमत, होम लोन ऑफर, एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर, आधार-यूएएन लिंकिंग इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह काही नवीन नियम लागू होतात.