ज्येष्ठ समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च हा स्मृतिदिन. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते. जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन ‘दीनबंधू’ नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांनां भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं. जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना महात्मा उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.
मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली.
पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.