अवकाळी पावसाने राज्यात पिकांचे झाले मोठे नुकसान ;पुण्यात पावसाने 840 जनावरे दगावली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत बुधवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने आणि थंडीने गारठून ८३८ शेळ्या, मेंढ्या व दाेन गायी अशी एकूण ८४० जनावरे दगावली आहेत. आंबेगाव तालुक्यात १४३, खेड – २९, हवेली-१७, जुन्नर- ४४३,बारामती-४०, शिरूर-१०९, मावळ-२९, दाैंड-२८,भाेर-२ अशी एकूण ८४० जनावरे अचानक दगावल्याने मेंढपाळ व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे पंचनामे गुरुवारी दिवसभर करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईआे आयुष प्रसाद यांनी सांगितले की, मागील २४ तासांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणात संततधर पाऊस झाल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या लाेकरीत पाणी झिरपून त्यांना बराचकाळ गारठा जाणवल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्थलांतर करणाऱ्या मेंढपाळांचे नुकसान झाले असून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.

महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान
सातारा | सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतीला बसला आहे.ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा तसेच जावली, महाबळेश्वर , पांचगणी परिसरातील स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाबळेश्वर, पाचगणी, दांडेघर, भिलार, भोसे, मेटगुताड, जावळीतील सायघर, कावडी, रानगेघर,काटवली, सोमर्डी, हुमगाव,करहर परिसरात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ही स्ट्रॉबेरी पावसाने वाया जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कराड, सातारा, पाटण, खटाव, खंडाळा, माण, कोरेगाव, फलटण, वाई, जावळीत गहू, हरभरा, ज्वारी या पिकांनाही माेठा फटका बसला.

पावसाने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान
पंढरपूर | तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून सर्वच भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा ऊस तोडणी व वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

रायगडमध्ये चोवीस तासांत ६४.६ मिमी पाऊस
अलिबाग | रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६४. ६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. पनवेलमध्ये सर्वाधिक ८४ मीमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे, तर मुरुड येथे ७६ मिमी पाऊस झाला.

सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
सांगली |सांगली जिल्ह्यात बुधवारी ढगफुटी सदृश रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसाने ८० ते ८५ हजार एकरांवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
सरासरी पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७० ते ८० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे द्राक्ष, भाजीपाला, भात, फळबागांचे एक लाख हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात पीक क्षेत्राखाली एकूण दाेन लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचे दृष्टीने पंचनामे करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *