एजाज पटेलच्या जाळ्यात अडकला भारताला संघ, मयांकच्या शतकाने सावरले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिलाच दिवस गाजवला तो मुंबईकर एजाज पटेलनेच. आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही फलंदाजांना एजाजने बाद केले आणि टीम इंडियाचे कंबरडे मोडले. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना तर त्याने एकही धाव करून दिली नाही. पण त्याचवेळी मयांक अगरवाल हा एकटा खेळपट्टीवर ठाम मांडून उभा राहीला आणि त्याने शतक झळकावल्यामुळेच भारताचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. मयांकच्या शतकाच्या जोरावर भारताला पहिल्या दिवशी ७० षटकांत ४ बाद २२१ अशी मजल मारता आली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात पुनरागमन केले आणि नाणेफेकीचा कौलही जिंकला. विराटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारल्यावर शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. गिलने तर दुसऱ्याच षटकात तीन चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. गिल आता मोठी खेळी साकारेल असे वाटत होते. पण त्याचवेळी एजाजने गिलला रॉस टेलरकरवी झेलबाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. गिलने यावेळी ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर मयांक अगरवालबरोबर खेळताना भारताला ८० धावांची सलामीही दिली. गिल बाद झाल्यावर एजाजने त्यापुढच्याच षटकात भारताला दोन मोठे धक्के दिले. एजाजने ३०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराला क्लीन बोल्ड केले, पुजाराला यावेळी एकही धाव करता आली नाही. एजाजने याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कोहलीलाही बाद केले आणि भारताला मोठा धक्का दिला. पुनरागमन करणाऱ्या कोहलीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. मुंबईकर श्रेयस अय्यरली यावेळी १८ धावांवर बाद झाला आणि भारताचा संघ अडचणीत सापडला. पण यावेळी मयांकने दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मयांकने पहिल्या दिवसअखेर १४ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद १२० धावांची खेळी साकारली. मयांकला यावेळी वृद्धिमान साहाने नाबाद २५ धावा करत चांगली साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *