महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ डिसेंबर । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद ६९ धावा केल्या असून त्यांच्याकडे आता ३३२ धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी एजाजच्या या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आणला. रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. भारताने फॉलोऑन न देता आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे.
भारताचा दुसरा डाव क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यामुळे शुबमन गिलऐवजी चेतेश्वर पुजाराने मयंक अग्रवालसोबत सलामी दिली. या दोघांनी चांगली सलामी देत अर्धशतकी भागीदारी रचली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने २१ षटकात बिनबाद ६९ धावा केल्या. पुजारा २९ तर अग्रवाल ३८ धावांवर नाबाद आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भन्नाट गोलंदाजी करत न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळवून दिली नाही. त्याने कप्तान टॉम लॅथम (१०), विल यंग (४) आणि रॉस टेलर (१) यांना बाद करत तीन धक्के दिले. सिराजने टेलरची दांडी गुल केली. त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (८) पायचीत पकडल न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. विराटने रवीचंद्रन अश्विनला चेंडू सोपवला आणि अश्विनने हेन्री निकोल्सची (७) दांडी गुल केली. अवघ्या ३१ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज बाद करण्यात भारताने जास्त वेळ गमावला नाही. अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने ८ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराजने ३ तर अक्षर पटेलने २ बळी घेतले. जयंत यादवला एक बळी मिळाला.