महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । द. आफ्रिकेने २४ नोव्हेंबर रोजी सर्वात आधी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची ओळख पटवली होती. दुसऱ्या दिवशी डब्ल्यूएचओने त्याला ओमायक्रॉन नाव देत ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ सांगितले. तेव्हापासून हा व्हेरिएंट जगातील ५० देशांत पसरला आहे. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे या व्हेरिएंटमुळे एकही मृत्यू झाला नाही. डब्ल्यूएचओनेही शहानिशा केली की, कोणत्याही देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेला नाही. म्हणजे ओमायक्रॉनला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ सांगितल्यानंतर १० दिवसांनंतरही एकही रुग्ण दगावला नाही.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे खासगी हेल्थ केअर नेटवर्कचे सीईओ रिचर्ड फ्रेडलँड यांच्या मते हा व्हेरिएंट अधिक संक्रामक आहे. यामुळे अधिक लोक संक्रमित होत आहेत. परंतु कोणातही गंभीर लक्षणे नाहीत. स्पॅनिश तापेतही असेच होते. हा व्हेरिएंट लस घेतलेल्या लोकांत जास्त पसरत आहे. परंतु त्याची सर्व लक्षणे सौम्य आहेत. जे आरोग्य कर्मचारी बूस्टर डोस घेतलेले आहेत, त्यांच्यातही सौम्य लक्षणे आहेत. केपटाऊनमधील डॉ. अँथोनी स्मिथ यांच्या मते ओमायक्रॉनच्या संक्रमितांत २०% प्रौढ, तर उर्वरित तरुण आहेत.
देशात एका दिवसात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढून २१ झाली आहे. रविवारी सर्वात आधी दिल्लीत एक ओमायक्रॉन संक्रमित आढळला. रविवारी सायंकाळी महाराष्ट्रात एकाच वेळी ७ रुग्ण आढळले, तर राजस्थानातील एकाच कुटुंबातील ९ सदस्य या व्हेरिएंटने बाधित आढळले. आतापर्यंत देशात राजस्थानात ९, महाराष्ट्रात ८, कर्नाटकात २ आणि गुजरात-दिल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असलेल्या भावाला लागोस (नायजेरिया) येथून भेटण्यास आलेली आई बाधित निघाली. तिच्या दोन मुली, भाऊ आणि दोन पुतण्याही ओमायक्रॉन संक्रमित आढळल्या. पुण्यातील एक ४७ वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉनची बाधा झाला आहे, तर राजस्थानात दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या ४ लोकांपासून ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
पुद्दुचेरीत लस बंधनकारक : देशात ओमायक्रॉनने प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरीने कोरोना लस बंधनकारक केली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागतील. हा आदेश न मानणाऱ्यांना कायदेरशीरपणे दंड केला जाणार आहे.
स्थानिक स्तरावर संक्रमण प्रवाशांत आढळला ओमायक्रॉन
– भारतासह १२ देशांत ओमायक्रॉनचा स्थानिक स्तरावर प्रसार; लोक विदेशात गेले नाहीत, पण संक्रमित झाले
– सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत ओळख पटल्यानंतर ओमायक्रॉन पीडित ३८ देश असे आहेत, जेथे प्रवाशांमुळे ओमायक्रॉन पसरला. त्यानंतर अनेक देशांनी या व्हेरिएंटच्या देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे.