महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच महाविद्याल व शाळकरी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मंत्र्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ०४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रूपयांची भर पडली आहे.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गेल्या एक महिन्याहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता एसटीची आतुरतेने वाट पाहत आहे. शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी – विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे शेतकरी, शेतमजूर अशा अनेक गोरगरीब प्रवाशी जनतेची एसटीअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन केले होते. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असा इशारा देत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचेही मंत्री परब यांनी घोषित केले होते. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. तसेच, जे कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, त्यांना पोलीस संरक्षणही दिले जात आहे.