महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । अॅशेस मालिका सुरू होण्याच्या दोन दिवसपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सोमवारी पुष्टी केली की इंग्लंडविरुद्धच्या आगामी अॅशेस मालिकेतील पाचवी कसोटी पर्थमध्ये खेळवली जाणार नाही. बायो-बललमध्ये येणाऱ्या अडचणी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलिया (WA) राज्यातील नियमांनुसार, खेळाडूंना तेथे पोहोचल्यानंतर क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. सामन्यासाठी पर्यायी जागा अद्याप निवडण्यात आलेली नाही, परंतु होबार्ट, तस्मानिया हे आघाडीवर आहे. क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्सनेही यजमानपदाची तयारी दर्शवली आहे.
सीएचे सीईओ निक हॉकले म्हणाले, “पर्थ स्टेडियमवर पाचव्या ऍशेस कसोटीचे आयोजन करण्यात असमर्थ ठरल्यामुळे आम्ही खूप निराश आहोत. सध्याच्या मर्यादा आणि आरोग्य व्यवस्थेत काम करण्यासाठी आम्ही डब्ल्यूए सरकार आणि डब्ल्यूए क्रिकेट यांच्या भागीदारीत जे काही करता येईल ते केले. पण दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.” पाच सामन्यांची मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पॅट कमिन्सला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.
इंग्लंडकडे सामना खेळण्याचा अनुभव जास्त
यावर्षी इंग्लंड संघ 12 कसोटी सामने खेळला आहे. संघाने 4 जिंकले आहेत तर 6 मध्ये पराभूत झाले आहे. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ यंदा केवळ 2 कसोटीच खेळू शकला आहे.
म्हणजेच इंग्लंडकडे जास्त सामने खेळण्याचा अनुभव आहे. इंग्लिश कर्णधार जो रूट चांगलाच फॉर्मात आहे. त्याने यावर्षी सर्वाधिक 1455 धावा केल्या आहेत. इतर कोणत्याही खेळाडूला 1000 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
बेन स्टोक्सने आरोग्याचे कारण पुढे करत T20 वर्ल्डकपमधून माघार घेतली होती. तो अॅशेस मालिकेतून पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाला बळ मिळाले आहे. मायदेशात झालेल्या अंतिम मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारताकडून पराभव झाला होता. अशा स्थितीत इंग्लंडलाही इतिहास रचण्याची संधी आहे.