महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ डिसेंबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी बैठक संपल्यानंतर आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही 2024 पर्यंत सुरू राहणार हा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर केन-बेतवा प्रोजेक्टला लिंक करण्यासाठीची मंजुरी देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
2.95 कोटी जनतेला घरकूल मिळणार
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास घरकूल योजने अंतर्गत 2024 पर्यंत 2.95 कोटी जनतेला घरकूलचा लाभ दिला जाणार आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत 1.65 कोटी लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ मिळला आहे.
आतापर्यंत किती झाला खर्च
अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री घरकूल योजने अंतर्गत मार्च 2021 पर्यंत 1.97 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यातील 1.44 लाख कोटी केंद्र सरकारने खर्च केले आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी वाढवण्यात आला असून, त्यासाठी 2,17,257 कोटी रुपयांच्या निधीला अधिकची मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा मुळ उद्देश ज्यांना राहण्यासाठी घर नाही, त्यांना स्वत:च्या हक्काचे घर देण्यासाठी ही योजना आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना या योजने अंतर्गत घरकूल प्रदान करण्यात येते, त्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.
केन-बेतवा प्रोजेक्ट लिंक
प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेसह आजच्या बैठकीत केन-बेतवा प्रोजेक्टवर देखील निर्णय घेण्यात आला आहे. केन आणि बेतवा या दोन नद्यांना जोडण्यासाठीच्या प्रकल्पाला 44,605 कोटी रुपये खर्चून जोडल्या जाणार आहे. त्यात केंद्र सरकारचा 90% योगदान असणार आहे. पुढील आठ वर्षात या प्रकल्पाचे काम पुर्ण होणार आहे. केंद्र सरकार या प्रकल्पाच्या कामासाठी 39,317 कोटी रुपये देणार आहे.