उद्या चंपाषष्ठीला खंडोबाचे षडरात्रोत्सव संपणार ; असे करा पूजेचा विधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ डिसेंबर । महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खंडोबाचे षडरात्रोत्सव अर्थात खंडोबाचा सहा दिवसाचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून केला जातो. मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला तो संपतो. या निमित्ताने कोणता कुलाचार केला जातो ते जाणून घेऊ.

पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला. तेव्हा शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मणी मल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लारी, मल्लारीमार्तंड, खंडोबा, खंडेराय असे नाव पडले.

पूजेचा विधी : एका ताम्हनामध्ये किंवा ताटामध्ये श्रीफळ, सुपारी, विड्याची पाने, फळे आणि भंडारा ठेवतात. तेथे नजीकच एका कलशावर श्रीफळ ठेवून त्याची पूजा करतात. खंडोबाला आवाहन करतात. त्या कलशात खंडोबाचे तेज अवतरले असे समजून त्याची पूजा करतात.

नंतर तुपाचे निरांजन लावून ते ताम्हनात ठेवतात व ते ताम्हण कलशाभोवती तीनदा ओवाळतात. मग कलशावरचे श्रीफळ उचलून कपाळाला लावतात. या वेळी सर्व जण ‘येळकोट मल्हार- चांगभलं’ असे म्हणत खंडोबाची करुणा भाकतात. खंडोबाला नैवेद्य दाखवून दुसरे दिवशी पूजेचे उद्यापन करतात.

जेजुरी, निमगाव, पाली पेम्बर, नळदुर्ग, शेंगुड, सातारे, मालेगाव (नांदेड), मैलापुर, मैलारसिंग, देवरगुड्डू, मणमैलार वगैरे खंडोबाची तीर्थक्षेत्रे आहेत. लग्न झालेली नवदाम्पत्ये जेजुरीला किंवा त्यांचे कुलदैवत खंडोबा ज्या गावी असेल त्या गावी जाऊन तळी आरती करतात. हा कुलाचार आहे. त्याला आहेर यात्रा म्हणतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *